ठाणे नौपाडा येथील मुख्य भाजी मार्केटचे तलावपाळीला विकेंद्रीकरण. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय; प्रत्येक भाजीविक्रेत्यांची अँटीजेन चाचणी.

 ठाणे -: नौपाडा येथील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांकरिता तलावपाळी येथे मार्किंग करून मार्केटचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार सदरच्या भाजीमार्केटचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने या मुख्य मार्केटमधील भाजी मार्केट, मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केटमधील सर्वांची अँटीजन टेस्ट करण्यात येत असून आतापर्यंत ३०० जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे.



  राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार लॉकडाऊन काळात अत्यावश्यक भाजीमार्केट, फळमार्केट, मसाला, धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट तसेच मच्छी मार्केट यांना योग्य ती खबरदारी घेत विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील सर्वच मार्केटमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नौपाडा येथील मुख्य भाजीमार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी तसेच योग्य ती खबरदारी घेत नागरिकांना खरेदी करता यावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मार्केटचे विकेंद्रीकरण करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने   महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार सदरच्या भाजी मार्केटचे तलावपाळी येथे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

तलावपाळी येथे नागरिकांना गर्दी न करता भाजी खरेदी करता यावी याकरीता योग्य ते मार्किंग करून ठराविक अंतराने विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास २४८ भाजी विक्रेते असून २५२ विक्रेतांना मार्किंग करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजीमार्केट, फळमार्केट, धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट तसेच मच्छी मार्केट आदी ठिकाणच्या सर्व विक्रेत्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३०० जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.

 दरम्यान आज अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे यांनी सदर भाजी मार्केटच्या मार्किंग तसेच विक्रेत्यांच्या अँटीजेन चाचणीची पाहणी केली, यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.